विराट – रोहितची टी 20 मधून निवृत्ती, शरद पवार म्हणाले दोघांचा निर्णय …

पुणे : भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून टी२० वर्ल्ड कप जिंकला. २००७ नंतर १७ वर्षांनी पुन्हा एकदा भारताने टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारतीय संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं. भारतीय संघाने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. द्रविडने खेळाडूंना योग्य मार्गदर्शन केलं अशा शब्दात राहुल द्रविडचं कौतुकसुद्धा केलं.

शरद पवार म्हणाले की, एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केलं. टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. पण भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला.

अंतिम सामन्यात १६ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड होतं. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली आणि सामना जिंकून दिला. अंतिम सामन्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि यादव यांनी चांगली कामगिरी केली. t20 च्या विजेतेपदाच्या दुष्काळातून भारताची मुक्तता झाली.

भारताने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दोन धक्के बसले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहित विराटने नवोदितांना संधी मिळावी आणि जे मिळवायचं होतं ते मिळवलं असं म्हणत निवृत्ती जाहीर केली. शरद पवार यांना रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत विचारले असता पवार म्हणाले की, ते t20 मधून रिटायर होत आहेत. दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू. फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असतं.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. आता टी२० मधून निवृत्ती घेताना नव्याना संधी मिळावी ही त्यांची भूमिका आहे. माझ्या मते हा निर्णय योग्य आहे. सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित केले. या दोघांचा निर्णय बरोबर आहे मी त्यांचा अभिनंदन करतो असंही पवारांनी म्हटलं.

Leave a Comment