राहाता – शहरात मंगळवारी सकाळी नगर-मनमाड महामार्गावर दुचाकी व टँकर यांच्यात भिषण अपघात झाला. टँकरच्या टायर खाली सापडून 33 वर्षीय साकुरी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बनसोडे यांचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील भडांगे हॉटेलजवळ घडली. या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सचिन योसेफ बनसोडे यांनी राहाता पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, भाऊ विश्वनाथ प्रकाश बनसोडे हा नगर-मनमाड रोडवरून राहाता पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या चहाच्या दुकानाजवळून (एम एच 17 बी ए 6811 क्रमांकाची) दुचाकी घेऊन जात असताना रस्त्यावरून जाणार्या (क्रमांक एम एच 17 के 9045) दुधाच्या टँकरने जोरदार धडक दिल्याने तोल जाऊन भावाची दुचाकी टँकरच्या चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी होऊन रोडवर पडल्याने त्याच्या डोक्याला, पाठीला व पोटाला दुखापत झाली. पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
