अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 71 वर्षांच्या वृद्धाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. भानुदास मिसाळ असं हत्या झालेल्या वृद्धाचं नाव आहे तर अशोक घोलप असं आरोपीचं नाव आहे, पोलिसांनी पाठलाग करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने भानुदास मिसाळ यांचे व्याही लहू सानप यांच्यावर देखील हल्ला करून त्यांना जखमी केलं आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगरमधील राजश्री कॉलनी कपिलेश्वर नगर भागात भरदिवसा ही घटना घडली आहे. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी अशोक घोलप याने दहशत माजवत हातात चाकू घेऊन ज्येष्ठ नागरिक भानुदास मिसाळ यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केला. या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने मिसाळ यांचे व्याही लहू सानप यांच्यावर देखील हल्ला केला. या घटनेत ते जखमी झाले आहेत.
आरोपी अशोक घोलप याला पोलिसांनी पाठलाग करत आनंद धाम येथे जेरबंद केलं. आमदार संग्राम जगताप, शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भरती यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी अशोक घोलप हा गेल्या वीस वर्षांपासून या कॉलनीमध्ये दहशत माजवत आहे. आज सकाळी एका वृद्ध महिलेला देखील त्याने दांडक्याने मारहाण केली. त्याच्या घरामध्ये कोयते, तलवारी, कुऱ्हाडी अशे धारदार शस्त्र आढळून आली आहेत. घटनेबाबत अधिक तापस सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
