नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीतील आंदोलनाबाबत खळबळजनक दावा केलाय. वर्षभरापूर्वी अंतरवालीत झालेल्या लाठीचार्जवेळी पोलीस कारवाईनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील तिथून निघून गेले होते.
पण नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांना तिथं आणून बसवलं असा आरोप भुजबळांनी केलाय. छगन भुजबळ यांनी यात रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर आरोप केले असून शरद पवार यांचंही नाव घेतलंय.
अंतरवाली सराटीत वर्षभरापूर्वी आंदोलनावेळी लाठीचार्जची घटना घडली होती. यानंतर हे आंदोलन राज्यभरात पेटलं. मनोज जरांगे पाटील यांनी तेव्हापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरे केले. छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये बोलताना म्हटलं की, अंतरवालीत पोलिसांच्या कारवाईनंतर मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्याला पुन्हा तिथं आणून बसवलं. जरांगे आल्यानंतर या दोघांनीही शरद पवारांनासुद्धा तिथं बोलावून घेतलं.
दरम्यान, शरद पवार यांचे नाव घेतले असले तरी शरद पवारांना तिथं काय घडलं याची कल्पना नव्हती असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगेंना तिथं पुन्हा आणून बसवल्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी शरद पवारांना तिथं बोलावलं. तेव्हा शऱद पवार यांना तिथं मोठ्या प्रमाणात पोलिसांवरही दगडफेक झालीय याची माहिती नव्हती असं भुजबळांनी म्हटलंय. छगन भुजबळ यांच्या या दाव्यामुळे पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
