पारनेर पाणी प्रश्न ; उपोषणकर्त्यांच्या मागण्या थेट आण्णा हजारेंच्या दरबारी

पारनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे यांनी २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणावर ठाम असल्याचा निर्णयच उपोषणकर्त्यांनी घेतलाय. 

दरम्यान उपोषणाला पाच दिवस उलटून गेले तरीही अद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही. तसेच प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला देखील नाही. त्यामुळे उपोषण लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहे. मात्र उपोषणकर्त्यांची प्रकृती आता काहीसी खालावली आहे. प्रशासनाने अद्यापही उपोषणाकडे लक्ष न दिल्याने आता शेतकरी संतप्त होताना दिसत आहे.

दरम्यान उपोषणाच्या सहाव्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची काही कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या संदर्भात राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी अण्णा हजारेंना उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच या कार्यकर्त्यांनी अण्णांना सर्व वस्तूस्थिती सांगितली. यावेळी अण्णांनी लढा चालूच ठेवावा असे सांगितले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या भेटीवेळी अब्बास मुजावर, गोकूळ काकडे, एस.एल.ठुबे, सुयश वाळुंज उपस्थित होते.

Leave a Comment