गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. अशातच आज दसऱ्याच्या दिवशी पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट आहे.
दुसरीकडे जालना, बीड विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात तुफान पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, सातारा, कोल्हापूरमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
