अहिल्यानगर : कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर आरोपी वसंत देशमुख याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. देशमुख यांनी केलेल्या विधानाचे निषेध विरोधकांनी केला. सोबतच सत्ताधाऱ्यांनीही आम्ही या विधानाचे समर्थन करत नाही, असे म्हणत देशमुख यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, असे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, देशमुख यांच्या या विधानानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाला. या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ केली. तसेच देशमुख यांना लवकरत लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी शेवटी वसंत देशमुख यांना रात्री उशिरा (27 ऑक्टोबर) पुण्यातून संगमनेरमध्ये आणले आहे.
जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. अहिल्यानगरमधील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने देशमुख यांना पुण्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मध्यरात्री उशिरा संगमनेर येथे आणण्यात आले. त्यांची संगमनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देशमुख यांना प्राथमिक उपचारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांना 28 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर न्यायालय देशमुख यांना कोठडी सुनवायची की नाही? हे ठरवले जाणार आहे.
