बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंची उडवली खिल्ली, म्हणाले कुपाटी कुपाटीने पळाला आणि….

गेल्या काही काळापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात वेगळाच वाद रंगताना दिसत आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी कोल्हार गावात आयोजित सभेत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला.

कोल्हार गावातील आयोजित सभेत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आजच्या सभेला कुणाला बोलावलं, बस भरून आणल्या, खाटुक खुटुक ठेवलं असं काहीही झालं नाही. पण आजची उत्स्फूर्त सभा आहे आणि अशी सभा विजयाची असते. बाजार समिती निवडणुकीच्या वेळी कोल्हारमध्ये भगवती मातेच्या दर्शनाला आलो होतो. तेव्हा म्हणालो होतो मी पुन्हा येणार, पुन्हा येणार आणि खरंच पुन्हा आलो आहे. गणेश कारखाना निवडणुकीच्या वेळी देखील दर्शन घेऊन गेलो होतो. लोकसभेचा प्रचार सुरू असताना सुद्धा देवीचे आशिर्वाद घेऊन गेलो होतो. आताही आशिर्वाद घेतले आहेत. भगवती माता ही लढाईची देवता आहे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर निशाणा साधला.

सुजय विखेंबद्दल बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ते (सुजय विखे) आता संगमनेर तालुक्यात फिरत आहेत. मध्यंतरी त्यांनी काय उद्योग करून ठेवले? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, हे जिथे जातात तिथे त्यांना दुष्ट बुध्दी सुचते. त्या गड्याला वान नाही पण गुण लागला आहे. मागे एकदा वाईट बोलल्यावर दहा पंधरा मिनिटात महिला मंडळ सभेच्या स्टेजवर आलं होतं. गाव उठून आलं होतं. मात्र याचा अर्थ ते सगळे आमचे होते असे नाही. माझे विरोधक देखील म्हणतात तो वाईट बोलला. त्यामुळे अख्खा तालुका उठून आला होता. 15 मिनिटात सगळे रस्ते बंद केले होते. पळता भुई थोडी झाली होती. कुपाटी कुपाटीने पळाला आणि दुसऱ्या दिवशी काटे काढत होता, अशी खिल्ली बाळासाहेब थोरातांनी उडवली.

Leave a Comment