श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मिळत आहे. श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लहू कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दोन दिवसांपूर्वी केली होती.
भाऊसाहेब कांबळे आता बस्स झालं, प्रचारात माझा फोटो वापरू नका, तुम्ही विश्वासघात केलाय, असा इशाराच त्यांनी दिला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी सभा घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी दिली आहे. त्यानंतर आता विखे पाटलांकडून शिंदे गट आणि अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत देण्यात आले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज मागे घेऊ, असे मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मी त्याबद्दल भाऊसाहेब कांबळे यांना सांगितले होते. मात्र नंतर काय झाले माहित नाही. अर्ज माघारीच्या दिवशी ते नॉटरिचेबल झाले. भाऊसाहेब कांबळे उभे राहणार असतील तर महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल.
मात्र जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला कळवण्यात आले होते. त्यामुळे कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे मी जाहीर केले. मात्र मुख्यमंत्र्यांना वाटतं असेल की भाऊसाहेब कांबळे हेच त्यांचे उमेदवार आहेत. तर शेवटी मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
