पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून काशिनाथ दाते निवडणुकीच्या रिंगणात आहे. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला आहे. काशिनाथ दाते यांना निलेश लंके यांचे कट्टर विरोधक विजय औटी यांनी पाठिंबा जाहीर केलाय.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काशिनाथ दाते यांच्या प्रचारासाठी पारनेरमध्ये सभा घेतली. या सभेत विजय औटी यांनी हजेरी लावत काशिनाथ दाते यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे राणी लंके यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील काशिनाथ दाते यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पारनेरमध्ये काशिनाथ दाते यांची ताकद वाढली आहे.
पारनेरच्या सभेत अजित पवार म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक सभा केल्या. पारनेर तालुक्यात आल्यावर माझ्या आजोळी आल्यासारखं वाटतं. अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी मला माहीत आहे. पारनेरच्या जागेबाबत महायुतीतील इतरही पक्षाने मागणी केली होती. मागे एकदा बबनराव पाचपुते यांनी जसं वेगळी वाट धरली, तेव्हा पाच-सहा विरोधकांना एकत्र केलं होतं. तसंच पारनेरमधील पाच-सहा जणांना एकत्रित करून उमेदवारी देण्यात आली आहे. जे काशिनाथ दाते यांच्यासोबत आले आहेत. त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
दरम्यान, अजित पवार यांच्या सभेत पारनेरचे अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी उपस्थिती लावली. विजय औटी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दातेंना पाठिंबा दिला. ते निलेश लंके यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. निलेश लंके यांना विरोध करण्यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. आता विजय औटी यांनी काशिनाथ दातेंना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण निर्माण झाले आहे
