मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटल्याची चर्चा असून मुख्यमंत्रिपद हे भाजपला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आमदार आग्रही होते. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कल्पना असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आल्याचं मत या आमदारांचं आहे. तसेच विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली, त्यांचाच चेहरा वापरण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांनाच मिळावं यासाठी शिवसेना आमदार आग्रही होते. पण आता मुख्यमंत्रिपद हे भाजपला जाणार अशी खात्रीलायक बातमी समोर येत आहे.
विधानसभेची मुदत संपली
राज्याच्या विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर पर्यंत होती. ती आता संपल्याने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे मंगळवारी सकाळी 11 वाजता राजीनामा देणार आहेत. लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत शिंदे राजीनामा देणार आहेत.
