विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला. यामध्ये बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर आज मतदारसंघात कार्यकर्त्याचा संवाद मेळावा पार पडला.
या मेळाव्यात बोलताना माजी आमदार सुधीर तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबद्दल भाष्य करताना एक मोठं विधान केलं. “साहेबांचं (बाळासाहेब थोरात) काय चुकलं? मला वाटतं की ते भाजपामध्ये गेले असते तर मंत्री झाले असते”, असं सुधीर तांबे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे.
नेमकं काय म्हणाले सुधीर तांबे
“आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे. मग जाती-जातीमध्ये भांडणे लावून आपण विकसित भारत घडवणार आहोत का? आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही अशा प्रकारे न्याय देणार आहात का? तरुणांची स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत का? अशा प्रकारचं राजकारण या देशात सुरु आहे. आता साहेबांचं (बाळासाहेब थोरात) काय चुकलं? मला वाटतं की ते भाजपामध्ये गेले असते तर मंत्री झाले असते. मात्र, आपल्याला आवडलं असतं का? जे काही राजकारणातील पावित्र्य आणि जे काही तत्व आहेत, ते तत्व जपून ते काम करत आहेत”, असंही सुधीर तांबे यांनी म्हटलं.
