शिंदे सरकारमध्ये महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते देताना ते विभागून देण्यात आले. त्यांची आधीची दोन्ही खाती गेली. त्यांच्याकडे गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार असेल.
गिरीश महाजन हे या आधी ग्रामविकास व पर्यटन मंत्री होते पण ही दोन्ही खाती गेली. आता त्यांना जलसंपदा (विदर्भ व तापीखोरे) आणि आपत्ती व्यवस्थापन अशी खाती देण्यात आली. शिंदे सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा हे खाते धनंजय मुंडेंकडे गेले. मुंडे हे शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री होते, आता अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे नवे कृषी मंत्री असतील. मुंडे यांना आधीपेक्षा तुलनेने कमी महत्त्वाचे खाते मिळाले.
जयकुमार रावल यांनाही पणन व राजशिष्टाचार ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाली. देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीच्या मंत्रिमं- डळात महिला, बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांना यावेळी पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन अशी खाती देण्यात आली. भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, खारपाण पट्टा विकास या खात्यांवर समाधान मानावे लागले.
