पंतप्रधान मोदींनी अण्णा हजारेंचा भाषणात केला उल्लेख, म्हणाले….

दिल्लीतील पक्षाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपच्या मुख्यालयात पक्षाच्या विजय सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील भाजप खासदारांनीही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.

प्रत्येक भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी हमी देतो की, कॅगचा अहवाल विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मांडला जाईल, ज्याने लूट केली असेल त्याला ते परत करावे लागेल. आपदा वाल्यांनी आपले घोटाळे लपवण्यासाठी रोज नवनवीन कट रचले. आता दिल्लीचा जनादेश आला आहे. आता प्रत्येक भ्रष्टाचाराची चौकशी होणार आहे. दिल्ली एनसीआरमध्ये भाजपची सत्ता आली आहे. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश अशा प्रत्येक शेजारील राज्यात भाजपची सरकारे आहेत. हा अतिशय आनंददायी योगायोग आहे.

पंतप्रधान मोदींनी अण्णा हजारे यांचाही केला उल्लेख –

अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले की, ‘आप-दा’चे हे लोक राजकारण बदलतील असे सांगून राजकारणात आले होते, मात्र हे लोक उघडपणे बेईमान निघाले. आज मी अण्णा हजारे यांचे वक्तव्य ऐकत होतो. अण्णा हजारे या लोकांच्या दुष्कर्माचे दु:ख दीर्घकाळ भोगत आहेत. आज त्यांनाही या वेदनेतून मुक्ति मिळाली असेल. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनातून जन्माला आलेला पक्ष भ्रष्टाचारात अडकला. देशातील असा पक्ष बनला ज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले. ज्यांनी स्वतःला प्रामाणिकपणाचे दाखले दिले तेच भ्रष्ट निघाले. हा दिल्लीचा मोठा विश्वासघात होता. दारू घोटाळ्यामुळे दिल्लीची बदनामी झाली. शाळा आणि हॉस्पिटलमधील घोटाळ्यांनी गरीबातल्या गरिबांना त्रास दिला आणि त्यांचा अहंकार इतका वाढला की जेव्हा जग कोरोनाशी सामना करत होते तेव्हा हे लोक ‘शीशमहाल’ बांधत होते.

Leave a Comment