शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या पक्षात पुढील 8 दिवसांत मोठा भूकंप होईल. त्यानंतर त्या पक्षात कोण राहणार व कोण राहणार नाही हे स्पष्ट होईल, असे सूचक विधान भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ माजली आहे.
महाजन पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, संजय राऊत नाशिकमध्ये येऊन संघटनात्मक बैठक घेऊन गेले. पण त्यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरेही बेजार झाले असतील. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. संजय राऊत एकटेच ठाकरे गट संपवण्यासाठी पुरेसे आहेत. त्याला इतरांची गरज लागणार नाही. त्यांची बडबड व विचार काय आहे ते नंतर पाहू. तूर्त निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू.
नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. पुढे काय होते ते आठवड्याभरात स्पष्ट होईल. 8 दिवस थांबा. पुढे काय होते ते पाहा. सगळे मोठ प्रवेश असतील. त्यात काही पक्ष अक्षरशः नेस्तनाबुत होतील, असे ते म्हणाले.
