पारनेर (DSNews24/किरण पुरी) सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये व गावापासून ते तालुक्यापर्यंत जाऊन एखाद्या कागदपत्रांसाठी त्यांना त्रास होऊ नये यासाठी माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात आपली सेवा आपल्याच दारी कॅम्प सुरू करण्यात आलाय. या कॅम्पचा शुभारंभ दिपक आण्णा लंके यांच्या हस्ते नांदूर पठार येथून करण्यात आलाय.
खरोखर सर्वसामान्य जनतेला नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड online करणे, आधार कार्ड अपडेट करणे, बांधकाम कामगार कार्ड काढणे, नवीन मतदार नाव नोंदणी करणे, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड वरील नाव कमी करणे व दुरूस्ती करणे यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जाऊन उंबरठे झिजवावे लागतात. मात्र एका हेलपाट्यात काम होईल ही गॅरंटी देखील नसते मात्र विनाकारण एक दिवस वाया जातो. मात्र माजी सरपंच रविंद्र राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात कॅम्प राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी सर्व कामे करून मिळणार आहे.
विशेषतः या कॅम्पमध्ये आतापर्यंत दीड हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच या कॅम्पला अक्षरशः महिला, पुरूष तसेच ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कॅम्पसाठी १६ स्वयंसेवक मदत करत आहे. माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून गावोगावी कॅम्प राबवत असल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
