कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा 

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. तब्येत खालवलेली असतानाही बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उपोषणस्थळी भेट देत बच्चू कडू यांची विचारपूस केली. यावेळी बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधत कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली.

कर्जमाफीबाबत एक समिती गठीत करण्यात येईल. या समितीत बच्चू कडू यांना सहभागी करून घेणार असून, समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नेमके काय म्हणाले बावनकुळे?

बच्चू कडू यांच्या ज्या 17 मागण्या आहेत, त्यासाठी आम्ही बैठक घेऊ, या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील, या बैठकीला बच्चू कडू यांची देखील उपस्थिती असेल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत ते म्हणाले की, दिव्यांगांचे अनुदान देताना ते बजेटमध्ये आणावे लागते, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते मांडण्यात येईल. त्यामध्ये किती वाढ करायची, ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कडू ठरवतील.

बच्चू कडू सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही

दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा झाली असता, मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन तो डेटा जमा केला जाईल व नंतर त्यावर तोडगा काढू. मात्र त्यानंतर लगेचच बच्चू कडू यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? असे विचारले असता, त्यावर सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून, सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी मागणी केली.

नवीन कर्ज देण्यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा करू

कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यात यावे, असे बच्चू कडू म्हणाले. त्यावर कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करेल व निर्णय घेऊ, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. तरीही, बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम आहेत. आम्ही यावर समाधानी नाही, आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment