संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत येथे गेल्या सहा वर्षांपूर्वी प्राथमिक उप आरोग्य केंद्र उभारण्यात आलं होतं. मात्र कित्येक वर्षांपासून ही इमारत अक्षरशः बंद अवस्थेत धूळ खात पडली होती. प्राथमिक उप आरोग्य केंद्रांची दयनीय अवस्थेची परिस्थिती DSNews24 ने उजेडात आणली होती. या प्राथमिक उप आरोग्य केंद्रांची अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली होती.
आरोग्य केंद्रात आता निवासी आरोग्य सेविका म्हणून मनिषा दुधवडे यांची नेमणूक केली आहे. आरोग्य सेविका या ठिकाणी रूग्णांच्या सेवेसाठी निवासी म्हणून राहणार आहे. परंतु समुदाय आरोग्य अधिकारी पदाची जागा रिक्त असून लवकरात लवकर ही जागा भरण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु अनेक वर्षांनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांच्या सेवेसाठी सुरू झाल्याने जांबुत मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ८ किलोमीटर अंतर पार करून साकूर येथे एखाद्या रूग्णाला उपचारासाठी जावे लागत होते मात्र आता जांबुतमध्येच त्या रूग्णाला ही सेवा मिळणार आहे.
नुकतेच आरोग्य सेविकेने १२ जुन रोजी गृहप्रवेश करतांना विधिवत पूजेचे आयोजन केले होते. उपसरपंच सुभाष डोंगरे सपत्नीक यांच्या हस्ते ही विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सरपंच सोनाली शेटे, रमेश शेटे, हरिभाऊ मेंगाळ, आरोग्य सेविक विलास दिघे, आशा सुपरवायझर मोमीन मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.
