फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ शहराचं नाव बदलणार

महाराष्ट्रातील शहरांच्या नामांतर प्रक्रियेला आणखी एक नवा अध्याय जोडला गेला आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील इस्लामपूर शहराचं नाव ‘ईश्वरपूर’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही माहिती राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत दिली.

भुजबळ म्हणाले की, ‘इस्लामपूरचं नाव बदलण्याची मागणी मागील ४-५ दशकांपासून सुरू होती. आरएसएसचे तत्कालीन स्थानिक प्रमुख पंत सबनीस यांनी सर्वप्रथम ही मागणी केली होती.’ एवढंच नव्हे, तर १९८६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही याच शहरातील सभेत इस्लामपूरला ‘ईश्वरपूर’ असे संबोधले होते.

राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर निर्णय घेत इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर असं निश्चित केलं आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, आता या नावबदलाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. मराठवाड्यातील औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशिव आणि नुकतंच अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यात आलं आहे.

दरम्यान, आता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे चौथं शहर ठरणार आहे ज्याचं नाव बदलून ईश्वरपूर करण्यात येणार आहे.

Leave a Comment