पुण्याच्या मावळ तालुक्यातील ठाकुरसाई गावात एका ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केलाय या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला ठाकुरसाई गावातून जात होती. आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपीने पीडितेला जवळच्या जंगलात नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी १६ जुलै रोजी स्थानिक पोलीस स्थानकामध्ये महिलेने तक्रार दाखल केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिलीमकर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्त्वाखालील पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. आरोपींबद्दल सुगावा मिळवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ आणि आसपासच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले.
गुन्हा नोंदवल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली. भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३५१ (२) अंतर्गत पुणे ग्रामीणमधील लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार झाल्याचा एफआयआर दाखल करण्यात आल्याचे संदीप सिंग गिल यांनी सांगितले.
