पारनेर(DSNews24/किरण पुरी) पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या मांडओहळ मध्यम प्रकल्प धरणाच्या सांडव्याची १ मीटर उंची वाढवावी अशी मागणी अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय.
दिल्ली येथील खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली. यावेळी उद्योजक बजरंग गागरे, सामाजिक कार्यकर्ते राजू रोकडे, विष्णु शिंदे, कैलास आग्रे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या मांडओहळ मध्यम प्रकल्पाची विद्यमान साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट इतकी आहे, तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. सदर धरणाची जलसाठवण क्षमता चांगल्या प्रकारे शिल्लक असून, दरवर्षी परतीच्या पावसामुळे धरण अल्पावधीतच ओव्हरफ्लो होते. सदर धरणाच्या सांडव्याची केवळ १ मीटर उंची वाढविल्यास, गोदावरी खोऱ्याच्या जलहिशोबावर (वॉटर अकाउंटिंग) कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. याउलट, धरणामधील साठवण क्षमता वाढल्यामुळे पारनेर तालुक्यातील जवळपास अर्धा भाग सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईपासून मुक्त होईल. सदर धरण गोदावरी खोऱ्या अंतर्गत येत असल्याने सांडव्याची उंची वाढवणे अडचणीचे होत आहे. तरी, आपल्याकडून सदर विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित पातळीवर पाठपुरावा करून आवश्यक त्या प्रशासकीय प्रक्रिया मार्गी लावून धरणाच्या सांडव्याची १ मीटर उंची वाढवण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे.
