पंचनामे करताना तलाठ्याला चावला साप….. अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना 

अहिल्यानगर – जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, महसूल विभागाच्या वतीने शेतांमध्ये जाऊन पंचनाम्याचे काम सुरू आहे. अशाच प्रकारे पंचनामे करत असलेल्या तलाठ्याला सर्पदंश झाल्याची घटना गुरुवारी (दि. 2 ऑक्टोबर) सकाळी घडली. आकाश रामभाऊ काशिकेदार (तलाठी, धनेगाव) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दसऱ्याच्या सणाचा दिवस असतानाही तलाठी आकाश काशिकेदार यांनी आपली जबाबदारी पार पाडत सकाळी 8 वाजल्यापासून धनेगाव परिसरातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले होते. यावेळी ते शेतकरी सुहास काळे, संदीप काळे व प्रमोद काळे यांच्या शेताकडे नदीच्या काठाने चालत जात असताना, गवतात लपलेल्या सापावर चुकून पाय पडल्याने सर्पदंश झाला.

सर्पदंश होताच तलाठी काशिकेदार यांना भोवळ येऊ लागली. त्यांच्या सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्यांना उचलले, धीर दिला आणि जवळच्या वस्तीवर नेले. त्यानंतर नदीतून गाडी जाऊ शकत नसल्यामुळे बंधाऱ्यावरून उचलत त्यांना नेण्यात आले. शेवटी शेतकऱ्यांनी शिलादीप हॉस्पिटल, जामखेड येथे दाखल केले.

या मदतीच्या कार्यात सुहास काळे, संदीप काळे, वैभव काळे, अनिल काळे, पवन काळे आणि मनोज काळे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांची तत्परता आणि मदतीची भावना यामुळेच तलाठ्याला वेळेत उपचार मिळाले. घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी शिलादीप हॉस्पिटलमध्ये जाऊन तलाठी काशिकेदार यांची प्रकृतीची विचारपूस केली. सुदैवाने सर्पदंशानंतर तात्काळ उपचार झाल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Leave a Comment