शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाने राजकीय वादळ निर्माण केले आहे. कदम यांनी दसरा मेळाव्यात दावा केला होता की, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता आणि त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले होते.
तसेच, त्यांच्या निधनाच्या तारखेबाबत आणि मृतदेह मातोश्रीवर ठेवण्याच्या कालावधीबाबत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. या विधानाने ठाकरे गट संतप्त झाला असून, त्यांचे उपनेते शरद कोळी यांनी कदम यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
‘झंडू बाम, झंडू बाम, रामदास कदम झालाय जाम’
शरद कोळी यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल करताना उपहासात्मक शैलीत टीका केली. ते म्हणाले, “झंडू बाम, झंडू बाम, रामदास कदम झालाय जाम! रामदास कदम, तुम्ही आठ दिवस मातोश्रीबाहेर मुक्काम करत होता, तेव्हा झाडून काढत होता आणि झेंडू बाम शोधत होता. खाल्लेल्या मिठाला जागा, आता भाजपचे सालगडी म्हणून तुमचा वापर होतोय.” कोळी यांनी कदम यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना भाजपचे हस्तक असल्याचा टोला लगावला.
