अरेरे! चिंचेवाडी येथील फ्लॉवरचे पिकच वाया गेलं, नेमकं कारण काय 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील चिंचेवाडी येथील शेतकरी तसेच रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवा सोन्नर यांनी लागवड केलेल्या फ्लॉवरची रोपे खराब निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे  सदर पिकच वाया गेलं असून शेतकऱ्याच मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.

अधिक माहिती अशी की, साकूर जवळील चिंचेवाडी येथील रहिवासी असलेले शेतकरी भिवा सोन्नर यांनी राणू सोन्नर यांच्या गट नंबर ६८३ व सरूबाई सोन्नर यांच्या गट नंबर ८०८/१ मध्ये अडीच एकर फ्लॉवरची लागवड केली होती. सोन्नर यांनी शेकाटा कंपनीची व्हॉइट फ्लॅशची फ्लॉवरची ४८ हजार रोपांची लागवड केली होती. यासाठी त्यांनी फवारणी, मशागतीसह जवळपास अंदाजे १ लाख ९० हजार रुपये खर्च केला आहे. मात्र काही दिवसांनंतर या रोपांची पाने, तसेच गड्डे खराब येत असल्याचे भिवा सोन्नर यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. मात्र वातावरणातील हवामानामुळे हा प्रकार झाला असेल असे संबंधित कंपनीने भिवा सोन्नर यांना सांगितले.

नंतर भिवा सोन्नर यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर उपविभागीय कृषी अधिकारी प्रविण गोसावी, तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दत्तात्रय साळुंके, बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राचे फुलोउत्पादन शास्त्रज्ञ डॉ. विलास घुले यांनी या फ्लॉवरच्या प्लॉटवर समक्ष जाऊन पाहणी करत पंचनामा केला. तसेच फ्लॉवरच्या रोपांवर नेमका कशाचा परिणाम झाला? संबंधित कंपनीच्या बियाणांमध्ये काही दोष आहे का? याची पुष्टी कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात येणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतर कारण स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment