संगमनेर : नदीच्या डोहात बुडून दोन तरूणांचा मृत्यू

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला शिवारातील प्रवरा(Pravara) नदीवरती शेळ्या, मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोन मेंढपाळ तरुणांचा नदीतील पाण्याच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार २६ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सोमनाथ कचरू जेडगुले ( वय 36, रा.धुळवाडची डोंगराची वाडी ता. सिन्नर) आणि शुभम रावसाहेब कोटकर (वय 20, रा. पिंपळे, संगमनेर) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघा मेंढपाळांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील मूळचा रहिवासी असणारा शुभम कोटकर यास आई-वडील नसल्यामुळे तो धांदरफळ खुर्द येथे आपल्या मामाकडे राहत होता.

तसेच सिन्नर तालुक्यातील डोंगराचीवाडी येथील मूळचा रहिवासी असणारा सोमनाथ जेडगुले हा पत्नीसह गोडसेवाडी, धांदरफळ शिवारात आपल्या सासरवाडीला मेंढ्या घेऊन चारण्यासाठी आले होते.

जेडगुले पती-पत्नी आणि शुभम कोटकर हे तिघे शेळ्या, मेंढ्या धुण्यासाठी नांदुरी दुमाला शिवारातील प्रवरा नदीवर बुधवारी दुपारी गेले होते. प्रवरा नदीच्या डोहामध्ये शेळ्या, मेंढ्या धुत असताना एक जण त्या डोहात पडला आणि तो बुडायला लागला. त्याचवेळी दुसरा त्याला वाचवायला गेला मात्र, तोही त्या डोहात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Leave a Comment