सरत्या वर्षाला निरोप अन् एकादशी निमित्त हरिकिर्तनचा गजर, मांडवे बुद्रुक ग्रामस्थांचा कौतुकास्पद उपक्रम 

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) गावात सामाजिक सलोखा, एकोपा राहावा तसेच अध्यात्मिक भाव निर्माण व्हावा यानिमित्ताने संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी गेल्या दीड वर्षापासून गावात खास उपक्रम सुरू केला आहे. ह. भ. प संत घुले बाबा यांच्या आशिर्वादाने तसेच थोरात कारखान्याचे संचालक रामदास धुळगंड सर व ह.भ.प दत्तात्रय महाराज धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या पहिल्या एकादशी निमित्त हरिकिर्तनचा सोहळा संपन्न होत आहे. त्यामुळे गावात वर्षभरापासून धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

२०२५ च्या सरत्या वर्षाच्या निरोपाच्या दिवशीच म्हणजे ३१ डिसेंबर रोजी एकादशी आल्याने या सोहळ्याच सर्व नियोजन महिला बचत गटाच्या वतीने येणार आहे. तसेच  महाप्रसादापासून ते महाराजांपर्यंत सौजन्य महिला बचत गट करणार आहे. त्यामुळे या सोहळ्याची तशी तयारीला महिला मंडळाने केली आहे. मांडवे बुद्रुक येथील हनुमान मंदिरासमोरील प्रांगणात सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प सुरेखाताई शिंदे यांचं जाहीर हरिकर्तन होणार आहे. त्यानंतर सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

यावेळी टाळ मृदुंगासह भजनासह हरिनामाच्या गजर होणार आहे. विशेषत महिलांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर उचलल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. गावात गेल्या दीड वर्षापासून १५ एकादशी निमित्त हरिकिर्तनचा सोहळा पार पडला आहे. आता ही १६ वी एकादशी आहे. तसेच २०२५ या सरत्या वर्षाला देखील भक्तिभावाने मांडवेकर निरोप देणार आहे. तसेच नवीन वर्षात नवा संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. मात्र मांडवे ग्रामस्थांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील हिंदू मुस्लिम बांधव यांचा जातिय सलोखा, बंधू भाव निर्माण केले आहे. त्यामुळे आम्ही सर्व एक आहोत हाच संदेश मांडवेकरांनी दिलाय.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या एकादशीला नामांकित किर्तनकारांनी मांडवे बुद्रुक गावात आपली किर्तनरूपी सेवा दिली. त्यामुळे गावातील सर्व घटकांना अध्यात्मिक विचार ऐकण्याची संधी मिळत आहे. त्याचबरोबर गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे बांधव तन मन धनाने सहभागी होऊन जी सेवा करण्याची संधी मिळेल ती सेवा करत असतात. या उपक्रमाबद्दल मांडवेकरांचे संपूर्ण पठार भागात कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Comment