पिंपरी / नाशिक : भरधाव वेगातील ट्रकच्या जोरदार धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
काळेवाडी परिसरात बुधवारी (दि. १४) दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मकर संक्रांत सणाच्या दिवशीच घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय २०, दोघेही रा. पुनावळे) या दोन्ही बहिणी दुचाकीवरून बाहेर पडल्या होत्या. काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ अचानक भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघी रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दोघींनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. काही वेळापूर्वी हसत-खेळत घरातून बाहेर पडलेल्या लेकी अशा अवस्थेत परत आल्याने कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला चटका लावणारा होता.या घटनेनंतर ट्रक चालक जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.
नाशिक मध्ये आईसह दोन चिमुकल्यांचा अपघातात मृत्यू
नाशिकच्या चांदवड – मनमाड रस्त्यावर सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाला होऊन या अपघातात मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
