सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटीच्या भव्य प्रांगणात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

अमरावती – सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटीच्या भव्य व प्रशस्त प्रांगणात 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी राष्ट्रगीतासह देशप्रेमाची भावना व्यक्त केली.

शालेय शिक्षण मंत्री महोदयांच्या पत्रानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लवचिकता, शारीरिक सुदृढता, शिस्त व संघभावना वाढविण्यासाठी सामूहिक कवायत घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या निर्देशांचे पालन करत 26 जानेवारी रोजी त्याचे सादरीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले.

त्यानुसार सीताबाई संगई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच सीताबाई संगई कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामूहिक कवायत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण 400 मुले व मुली यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने खडे कवायत, बैठक व विविध कवायत प्रकार सादर केले. देशभक्तीपर गीतांच्या संगीताच्या तालावर केलेली ही कवायत पाहताना उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक हालचालीत शिस्त, समन्वय व आत्मविश्वास दिसून येत होता. विद्यार्थ्यांच्या एकसंध हालचालींमधून संघभावना, नेतृत्वगुण व देशप्रेमाचे दर्शन घडले.

कवायत सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी म्हणून नियमित सराव केला होता. क्रीडाशिक्षक व संबंधित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, शिस्तीचे धडे व तालबद्ध हालचालींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा प्रभाव कार्यक्रमादरम्यान स्पष्टपणे जाणवला.

या यशस्वी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मविश्वास, शिस्त व राष्ट्रप्रेम अधिक दृढ होत आहे.

Leave a Comment