संगमनेर( प्रतिनिधी) भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना गेल्या ३३ वर्षांपासून जमीन एकत्रीकरणाच्या दुरूस्तीबाबत कुठलाही ठोस मार्गच निघत नसल्याने संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील नवनाथ मोठ्याभाऊ ढेंबरे, पंढरीनाथ भाऊ ढेंबरे, योगेश सुभाष ढेंबरे, सुनिल सिताराम ढेंबरे, संदिप भानुदास ढेंबरे या शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपासून संगमनेर येथील भूमि अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र अखेर संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे यांच्या पुढाकाराने तसेच युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा जयश्री थोरात यांच्या मध्यस्थीने व अहिल्यानगर भूमिअभिलेख विभागाचे अधिक्षक श्री. कुंभार व उप अधिक्षक डॉ. योगेश थोरात यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर ढेंबरे यांनी आपल आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेतलय. यावेळी जयश्री थोरात यांच्या हस्ते या शेतकऱ्यांनी ज्युस प्राशन करत आपलं उपोषण सोडवले. त्यामुळे अखेर जयश्री थोरात यांच्या मध्यस्थीने या आमरण उपोषणावर तोडगा निघाल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान जोपर्यंत आमच्या मागणीवर ठोस निर्णय निघून भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावरून उठणार नसल्याचा ठाम निर्णय या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला होता. मात्र पहिले दोन दिवस अधिकाऱ्यांना या उपोषणावर कुठलाही तोडगा निघत नव्हता. यादरम्यान संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे यांनी दुसऱ्या दिवशी थेट उपोषणस्थळ गाठले. तसेच उप अधिक्षक डॉ योगेश थोरात यांना धारेवर धरत या उपोषणकर्त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी मागणी केली. यावेळी अजय फटांगरे यांनी उपोषणस्थळावरूनच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना फोनवरून उपोषणाची माहिती दिली. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी देखील उप अधिक्षक डॉ योगेश थोरात यांना यावर योग्य तो तोडगा काढा असल्याचे सांगितले.
त्यानंतर २६ जानेवारीच्या दिवशी जयश्री थोरात यांनी थेट उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्यासाठी मागणी केली. यावेळी जिल्हा अधिक्षक श्री. कुंभार, उप अधिक्षक डॉ योगेश थोरात यांच्याशी जयश्री थोरात यांनी चर्चा केली. तसेच परिस्थिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा अधिक्षक श्री. कुंभार यांनी उपोषणस्थळावरून नाशिक विभागाचे श्री. इंगळे यांना याबाबत फोनवर चर्चा केल्यानंतर शेतकरी ढेंबरे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. मात्र यात अजय फटांगरे यांनी योग्य वेळी आपली शिष्टाई दाखवून आमरण उपोषणावर निर्णायक मार्ग काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका ठरली. त्यानंतर जयश्री थोरात यांच्या मध्यस्थीने तीन दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण सुटलं. तसेच गेल्या ३२ वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायासाठी कुठंतरी मार्ग निघाल्याचा आनंद उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
