नवी दिल्ली – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरूद्ध कडक शब्दात टीका केली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डॉ. मोहन भागवत यांच्यावर भाषिक मुद्द्यावरून टीका केली होती. रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका टिप्पणी करू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पलटवार केला होता. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
जी लोक कार्यक्रमाला आली ती सर्व लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. पण, राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, अशी उपरोधिक टीका कोश्यारी यांनी केली. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांना प्रत्युत्तर दिले. ज्याला धोतर नीट नेसता येत नाही रे तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय असं वक्तव्य केलं. राऊत यांनी मोदींना कोण घाबरतंय असं म्हणत राहुल गांधी यांच्या संसदेतील कालच्या भाषणाचा संदर्भ देखील दिला.
ज्याला धोतर नीट नेसता येत नाही तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय
संजय राऊत म्हणाले की, त्याला नीट धोतर नेसता येत नाही, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय. जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही, तो ठाकरेंना सांगतोय की मोदींना घाबरू नका. मोदींना कोण घाबरतंय? काल राहुल गांधींनी सांगितलं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही. गांधींचे भाषण सुरू असताना पंतप्रधान आणि अमित शाह यांनी संसदेतून पलायन केले आणि हे आम्हाला सांगत आहेत. तुमच्या हातात सत्ता आणि एजन्सी आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगत आहात. पहिले नीट धोतर नेसायला शिका आणि मग इथे महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा.
एक नंबरचा लफंगा माणूस
हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे. त्याला पद्मभूषण दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करणारा हा माणूस आहे. त्याला भारतीय जनता पक्षाने पद्मभूषण दिले. हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार नाही मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या. त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंनी जोड्याने मारले असते, अशी टीका त्यांनी केलीय.
