शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयावर उद्धव ठाकरे म्हणाले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पवारांच्या या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असून यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील भाष्य केले आहे…

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत कर्नाटक प्रचारातील मोदींच्या एका आवाहनाचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. तसेच बारसूमध्ये पोलीस बळाचा वापर करून रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर जबरदस्ती केली जात असल्याचे म्हणत ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तुम्ही शरद पवारांशी संवाद साधला का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता त्यावर उत्तर देतांना ते म्हणाले की, त्यांच्या पक्षात काय करायचे हा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे.

दुसरे म्हणजे नेत्यांचा जेवढा कार्यकर्त्यांवर अधिकार असतो, तेवढाच कार्यकर्त्यांचाही नेत्यावर असतो. त्यामुळे सर्वांच्या हिताचा निर्णय ते घेतील असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच मी त्यांना काय सल्ला देणार आणि मी दिलेला सल्ला पचनी नाही पडला तर काय करायचे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment