मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आले आहेत. लाच प्रकऱण पुढे आल्यानंतर झिरवळ बेपत्ता होते. आज ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे समजतेय. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता झिरवाळ राजीनामा देणार का? याची चर्चा सुरू झालेली आहे. मंत्रालयातील लाच प्रकरण समोर आल्यानंतर दोषी आढळलो तर राजीनामा देईल, असं झिरवाळ स्पष्ट म्हणाले होते.
आता या प्रकरणात दररोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. झिरवाळ यांचा थेट याच्याशी संबंध अद्याप समोर आलेला नाही. पण विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले झिरवळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. लाच प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर नरहरी झिरवळ कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यांच्या या ‘नॉट रिचेबल’ असण्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत झिरवळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. मंत्रालयातील या लाच प्रकरणामुळे झिरवळ पूर्णपणे कोंडीत सापडले असून, सुनेत्रा पवार यांच्यासोबत होणाऱ्या भेटीत काय चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मंत्रालयातील लाच प्रकरणातील आरोपी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे आज न्यायालयात सादर केली जाणार आहेत. पुराव्यांच्या आधारे आरोपींच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आता झिरवळ यांच्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधीच आज झिरवाळ सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीआधी झिरवाळ अन् पवार यांच्यात होणाऱ्या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. झिरवाळ राजीनामा देणार का? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
