अवघ्या काही दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या एका तरुण जोडप्याचा धाराशिव येथे भीषण अपघातात मृत्यू झाल्याची काळजाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथील रत्नापूर पाटीजवळ हा अपघात घडला.
अपघातग्रस्त कार टोलवेच्या कमानीवर जाऊन जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारमधील तरुण जोडप्याचा जागेवरच अंत झाला.
वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय शिनगारे (वय 25) आणि इजोरा येथील मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय 23, सध्या मुक्काम वाशी) यांचा गेल्या रविवारी (दि. 15) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता. मयत अक्षया हिला आज रविवारी लातूर येथे महापारेषणची परीक्षा होती. त्यासाठी ती आणि अक्षय हे दोघे पहाटे वाशी येथून लातूरकडे निघाले होते.
रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार टोलवेच्या कमानीवर जाऊन आदळली. यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. साखरपुड्यानंतर अवघ्या आठवडाभरात या दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट झाला आहे. या घटनेमुळे धाराशिवमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
