राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आज राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला जाण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. अध्यक्षपदा संदर्भात समिती नेमली आहे. या समितीने अध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला. बरेच पर्याय समोर आले. पर्यायाचा बराच विचार केला.
महाराष्ट्रात असो की देशातील सर्व नेत्यांना वाटतं शरद पवारच अध्यक्ष असावेत. आम्ही बराच पर्याय पाहिला पण आमच्यासमोर पवारांशिवाय कोणताच पर्याय दिसत नाही. त्यामुळे शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असावेत, असं छगन भुजबळ म्हणाले.
पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांचा राजीनामा मानायला तयार नाही. आम्हीही मानायला तयार नाही. शरद पवार हेच अध्यक्ष असावेत.
शरद पवार हेच कायमस्वरुपी अध्यक्ष असावेत असा ठराव आम्ही करणार आहोत. शरद पवार यांनाही अध्यक्षपदी राहण्याचा आग्रह धरणार आहोत. पण पवारांनी आमचं ऐकलं नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषण करू, असा इशारा भुजबळ यांनी सांगितलं.
