बापरे! मांडवे बुद्रुक येथे बिबट्याने फोडली डरकाळी

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक ( भगवान मळा ) येथील पप्पू कारभारी खेमनर यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात १४ मार्च रोजी बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र मांडवे बुद्रुक परिसरात अजूनही बिबटे असून वनविभागाने ठिकठिकाणी तातडीने पिंजरे लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अधिक माहिती अशी की, साकूरसह परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा संचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच या बिबट्यांचे नागरिकांना दर्शनही होत आहे. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना अक्षरशः शेतात जीव मुठीत धरून शेतमालाला पाणी भरावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी मांडवे बुद्रुक, बिरेवाडी येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटे जेरबंद झाले होते. मात्र बिबट्याचा संचार अजूनही थांबायच नाव घेत नाही.

बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांडवे बुद्रुक येथे बिबट्यांनी तळच ठोकला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण बिबट्यांच्या भितीने मांडवेकर अक्षरशः हादरून गेले आहे. तसेच तातडीने वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी देखील नागरिकांनी केली होती. त्यानंतर भगवान मळा येथील पप्पू कारभारी खेमनर यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. यावेळी बिबट्या पिंजऱ्यात अडकण्यासाठी पिंजऱ्यातील मागील कप्प्यात एक छोटस वासरू ठेवलं होतं.

याच भक्ष्याच्या उद्देशाने बिबट्याने पिंजऱ्यात पाय ठेवला आणि तो जेरबंद झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर पिंजरा बिबट्यासहीत ताब्यात घेतला. मात्र परिसरात बिबट्यांची संख्या बहुतांश असल्याने वनविभागाने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

Leave a Comment