संगमनेरमधील मुलीवरील ॲसिड हल्ल्यावरती चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया 

संगमनेर तालुक्यात इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने ॲसिडसदृश ज्वलनशील पदार्थ फेकला. या घटनेमध्ये मुलीचा चेहरा व हात गंभीर भाजला आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला आहे. पीडित मुलगी कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील एका खेडेगावात शिक्षण घेते. ती नातेवाईकाच्या घरी राहते. दुपारी ती शाळेतून सायकलवर घरी जात होती. त्यावेळी तिच्यावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे ती जोरत ओरडली. आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी तिला खासगी रुग्णालयात हलविले, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. तर भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत तो नराधम लवकरच पकडला जाईल आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, शासन कोणतीही तडजोड करणार नाही, असं म्हटलं आहे.

घटनेबाबत प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या, संगमनेर तालुक्यातील सहावी शिकणाऱ्या एका छोट्या मुलीवर शाळेतून घरी जात असताना झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या चिमुकलीच्या आईशी मी स्वतः बोलले आहे, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तिच्यावरती उपचार सुरू आहेत, तिला सर्वोत्तम वैद्यकीय मदत मिळेल याची शासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे, तिच्या कुटुंबाला देखील आवश्यक ती मदत केली जाईल ती लवकर बरी व्हावी हीच प्रार्थना आहे, या घटनेबाबत मी पोलीस अधीक्षकांशी देखील बोलले आहेत.

पोलीस प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली असून स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू आहे, त्या हरामखोराला शोधण्यासाठी दहा विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत, आणि त्याला लवकरच पकडून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री विखे पाटील या घटनेवर ती लक्षात ठेवून आहेत, संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या जात आहेत पालकांच्या सुरक्षेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका झिरो टॉलरन्स अशी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

Leave a Comment