मुंबई : जवळपास २५ वर्षे एकमेकांचे जीवलग सहकारी असे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे नाते होते. परंतु २०२२ साली ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करून गेली चार वर्षे एकनाथ शिंदे यांनी दखलपात्र राजकारण केले. या दरम्यान ठाकरे कुटुंबासोबत संघर्षाचे प्रसंगही आले. परंतु ठाकरेंविषयीचा मनातील ओलावा एकनाथ शिंदे यांनी शक्य तेवढ्या वेळा जपला. आजही उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेच्या निरोपावेळी शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचा उल्लेख साहेब असा केला.
विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांचा निरोप समारंभ सभागृहात पार पडला. उद्धव ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना शिंदे गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी अजित पवार गट), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस), संदीप जोशी (भाजप), दादाराव केचे (भाजप), रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप) आणि संजय केनेकर (भाजप) या ९ आमदारांची विधान परिषदेतील सदस्यत्वाची मुदत संपली. या सदस्यांच्या भावी आयुष्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. विशेष करून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शिंदे काय बोलतात, याकडे अनेकांचे लक्ष होते.
एकनाथ शिंदेंनी गुडबाय कसं केलं?
एकनाथ शिंदे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या सभागृहातून निवृत्त होत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठीही एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘साहेब’ असा विशेष उल्लेख केला.
एकनाथ शिंदे यांची चारोळी, उद्धव ठाकरेंकडून नमस्कार
निरोप देताना कुणाबद्दलही वाईट बोलायचे नसते. कोणत्या ना कोणत्या कारणाने सगळ्यांची भेट होणारच आहे. ओ जानो वालो हो सके तो लौटके आणा, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी चारोळी म्हटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला.
