देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिपदापासून दूर करण्यासाठी राज्यातील अनेक आमदारांनी खरातकडे जाऊन पूजा केल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे विधानसभेत मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून सामाजिक क्षेत्रातही संताप व्यक्त केला जात आहे. खरात प्रकरणात दररोज नवनवीन दावे केले जात आहेत. खरातला वाचवण्यासाठी पैसे घेतले जात असून मोठे अधिकारी तिथे लोटांगण घालत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला. अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अशोक खरात प्रकरणावरून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात केवळ काळी जादू किंवा अघोरी प्रथांचाच समावेश नाही, तर थेट सत्तेच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे.
अशोक खरातकडे जाऊन काही जण अघोरी पूजा करत होते. या पूजेचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावणे हा होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. “खरातकडे जाऊन ३८ आमदारांनी करंगळ्या कापल्याची यादी माझ्याकडे आहे, योग्य वेळी नावे जाहीर करेन,” असा दावाही आव्हाड यांनी केला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्तेसाठी अघोरी विद्येचा वापर करण्याच्या दाव्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
