सांगली – केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतील पराभवावर विनोदी टोलेबाजी केली. ‘बरं झालं मी हरलो, नाहीतर काँग्रेससोबत राहावं लागलं असतं,’ असं म्हणत त्यांनी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगतानाच रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावर तुफान टोलेबाजी केली. या पराभवामुळेच आपण शिवसेना-भाजपासोबत गेल्याचे ते सांगण्यास विसरले नाहीत.
सांगलीतील कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या टोलेबाजीने उपस्थितांचे मनोरंजन केले. काँग्रेसने आठवलेंसारख्या नेत्याला ताकद न दिल्याने पक्षाला मोठा फटका बसल्याचेही पाटील म्हणाले. शिर्डीतील पराभवावरून त्यांनी हे विधान केलं आहे. मी काँग्रेस सोबत होतो. काँग्रेसने मला शिर्डीतून तिकीट दिलं. पण बरं झालं मी शिर्डीतून हरलो. नाहीतर आज मला काँग्रेससोबत राहावं लागलं असतं, असा चिमटा रामदास आठवले यांनी काढला. तसेच आपल्याला पाडण्यासाठी की जिंकण्यासाठी तिकीट दिलं हे आजवर मला कळलं नाही, अशी मिश्कीलीही त्यांनी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.
बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्याला शिर्डीला बोलावलं, पण हरवण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी हे आपल्याला माहीत नव्हतं. मात्र काही प्रचारामुळे शिर्डीची निवडणूक हरल्यामुळे आपण शिवसेना भाजपासोबत गेलो, असं रामदास आठवले म्हणाले. यावेळी रामदास आठवले आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगली. विशाल पाटील हे अपक्ष खासदार नाहीत, ते सर्वपक्षीय खासदार आहेत. त्यांना सगळया पक्षांनी मदत केली आहे. कोणी वरून केली तर कोणी आतून, असं आठवले म्हणाले.
आठवलेंच्या या गुगलीवर विशाल पाटलांनीही षटकार लगावला. महिला विधेयका दरम्यान संसदेत रामदास आठवले यांना बोलू दिले नाही. पण ते बोलले असते तर कदाचित त्यांनी आम्हाला विधेयक समजून सांगितलं असतं. ज्यामुळे आम्ही प्रेरित होऊन चुकीचं बटन दाबू अशी भीती आमच्या मनात निर्माण झाली होती, असा खोचक टोला खासदार विशाल पाटलांनी रामदास आठवलेंना लगावला.
