संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील महावितरणचा गलथान कारभार समोर आला आहे. गेल्या महिनाभरापासून शेतकरी जयराम ढेरंगे यांच्या शेतात महावितरणचा विद्युत पोल एका बाजूला झुकल्याने वीजेच्या तारा अक्षरशः पडलेल्या अवस्थेत असल्याने जिवीतहानी होण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतकरी जयराम ढेरंगे यांनी साकूर महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा व महावितरण कर्मचाऱ्यांना शेतात पडलेल्या विद्युत तारा तातडीने पुर्ववत करण्यासाठी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने शेतकरी जयराम ढेरंगे यांनी थेट साकूर महावितरण कार्यालय गाठून सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा यांना धारेवर धरत गळ्यात हार आणि शाल घालत संताप व्यक्त केला. लवकरात लवकर जर विस्कळीत झालेल्या विद्युत तारा पुर्ववत नाही केल्या तर आमरण उपोषणाचा इशाराच शेतकरी जयराम ढेरंगे यांनी सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा यांना दिलाय.
सविस्तर माहिती अशी की, साकूर येथे शेतकरी जयराम ढेरंगे हे वास्तव्यात आहे. सदर ठिकाणी त्यांची मोठी शेती आहे. मात्र महिनाभरापूर्वी जयराम ढेरंगे यांच्या शेताच्या बांदावरील महावितरणचे विद्युत पोल एका बाजूला झुकले आहे. पोल झुकल्याने विद्युत वाहक तारा अक्षरशः शेतातच पडलेल्या आहे. त्यामुळे मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. या भितीमुळे जयराम ढेरंगे यांना शेतीच कामही करता येत नसल्याने सदर क्षेत्रातील काम ठप्प झाले आहे. सदर विद्युत वाहक तारा पुर्ववत करण्यासाठी जयराम ढेरंगे यांनी साकूर महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा यांना व कर्मचाऱ्यांना वारंवार संपर्क केला. मात्र आज होईल उद्या होईल या अपेक्षेने जवळपास महिना उलटून गेला.
मात्र तरी देखील गेंड्याचे कातडे पांघरुन बसलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांनी या गोष्टीकडे साध लक्ष दिले नाही. शेतात पडलेल्या वीजेच्या तारांमुळ एखाद्या जीवीतहानीची वाट महावितरणचे अधिकारी बघतायेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महावितरणकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी जयराम ढेरंगे यांनी शेवटी साकूर महावितरण कार्यालय गाठले आणि सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा यांना धारेवर धरत आमचा जीव गेल्यावर या वीजेच्या तारा पुर्ववत करणार का? असा सवाल उपस्थित केला.
यावेळी संतप्त झालेल्या जयराम ढेरंगे यांनी सहायक अभियंता राजेशकुमार झा यांना गळ्यात हार आणि शाल देऊन संताप व्यक्त केला. तसेच जर लवकरात लवकर शेतात पडलेल्या विद्युत वाहक तारा पुर्ववत नाही केल्या तर महावितरण कार्यालयासमोरच आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच यावेळी जयराम ढेरंगे यांनी दिला.
