DSNews24 चा साकूर महावितरणला जोर का झटका, जयराम ढेरंगेंचा “तो” प्रश्नच सुटला

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील महावितरणचा गलथान कारभार समोर आला असून गेल्या महिनाभरापासून शेतकरी जयराम ढेरंगे यांच्या शेतात महावितरणचा विद्युत पोल एका बाजूला झुकल्याने वीजेच्या तारा अक्षरशः पडलेल्या अवस्थेत असल्याने जिवीतहानी होण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतकरी जयराम ढेरंगे यांनी साकूर महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा व महावितरण कर्मचाऱ्यांना शेतात पडलेल्या विद्युत तारा तातडीने पुर्ववत करण्यासाठी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने शेतकरी जयराम ढेरंगे यांनी थेट साकूर महावितरण कार्यालय गाठून सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा यांना धारेवर धरत गळ्यात हार आणि शाल घालत संताप व्यक्त केल्याची बातमी DS News24 ने दि. २९ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली होती. अखेर या वृत्ताची महावितरणने गांभिर्याने दखल घेत तातडीने महिनाभरापासून शेतात पडलेल्या वीजेच्या तारा पुर्ववत केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी जयराम ढेरंगे यांची मोठी अडचण दूर झाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, साकूर येथे जयराम ढेरंगे हे वास्तव्यात आहे. सदर ठिकाणी त्यांची मोठी शेती आहे. मात्र महिनाभरापूर्वी जयराम ढेरंगे यांच्या शेताच्या बांदावरील महावितरणचे विद्युत पोल एका बाजूला झुकले आहे. पोल झुकल्याने विजेच्या तारा अक्षरशः शेतातच पडलेल्या होत्या. त्यामुळे मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या भितीमुळे जयराम ढेरंगे यांना शेतीच कामही करता येत नसल्याने सदर क्षेत्रातील काम ठप्प झाले होते. सदर विद्युत वाहक तारा पुर्ववत करण्यासाठी जयराम ढेरंगे यांनी साकूर महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा यांना व कर्मचाऱ्यांना वारंवार संपर्क केला. मात्र आज होईल उद्या होईल या अपेक्षेने जवळपास महिना उलटून गेला होता.

मात्र तरी देखील गेंड्याचे कातडे पांघरुन बसलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांनी या गोष्टीकडे साध लक्षही दिले नाही. शेतात पडलेल्या वीजेच्या तारांमुळ एखाद्या जीवीतहानीची वाट महावितरणचे अधिकारी बघतायेत का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. महावितरणकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी जयराम ढेरंगे यांनी शेवटी साकूर महावितरण कार्यालय गाठले आणि सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा यांना धारेवर धरत आमचा जीव गेल्यावर या वीजेच्या तारा पुर्ववत करणार का? असा सवाल उपस्थित केला होता.

यावेळी संतप्त झालेल्या जयराम ढेरंगे यांनी सहायक अभियंता राजेशकुमार झा यांना गळ्यात हार आणि शाल देऊन संताप व्यक्त केला होता. तसेच जर लवकरात लवकर शेतात पडलेल्या विद्युत वाहक तारा पुर्ववत नाही केल्या तर महावितरण कार्यालयासमोरच आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच यावेळी जयराम ढेरंगे यांनी दिला होता. या संपूर्ण घटनेची बातमी DS News24 ने प्रसिद्ध करताचा अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच महावितरणच्या कारभारावर देखील प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जयराम ढेरंगे यांच्या शेतात जाऊन पडलेल्या वीजेच्या तारा पुर्ववत केल्या आहेत.

Leave a Comment