आमदार रोहित पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी विलीनिकरणाच्या चर्चांना हवा दिली आहे. अहिल्यानगरमधील कर्जत मतदारसंघात त्यांनी नागरी प्रश्नांवर आंदोलन छेडले. त्यावेळी त्यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो, असे मोठे वक्तव्य शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. शेवटच्या टप्प्यात अजित पवार देखील भाजपच्या विरोधात बोलत होते. अजित पवारांचा पक्ष भाजपच्या मांडीला मांडी लावून बसत असेल तर आम्ही एकत्र कसे येणार? असा सवाल त्यांनी केला. या एकमेव अटीवरच राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाचे घोडे अडलेले आहे.
सत्ताधाऱ्यांसोबत जायचे की महाविकास आघाडीत राहायचे यावरून दोन्ही राष्ट्रवादीतील मतभेद यापूर्वी सु्द्धा उफाळून आले होते. तर अजितदादांनी विकासासाठी सत्तेत असणे आवश्यक असल्याचे सांगत राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांसह महायुतीत प्रवेश केला होता.
