राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दोन टर्म आमदारकी गाजवलेला अजित पवारांचा शिलेदार हरपला आहे. शुक्रवारी भल्या पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. दोन टर्म आमदारकी गाजवलेल्या बड्या नेत्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने मतदारसंघात शोककळा पसरली आहे.
जालना जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठा चेहरा आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, परतूर-मंठा परिसरात शोककळा पसरली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास सुरेशकुमार जेथलिया यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. प्रकृती खालावल्याचं लक्षात येताच त्यांना तातडीने जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
दोन वेळा भूषवले आमदारपद
सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा नेतृत्व केलं होतं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली होती. जनसंपर्क दांडगा असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या निधनामुळे एका अनुभवी नेतृत्वाला जिल्हा मुकल्याची भावना आहे.
जेथलिया यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची मोठी खेळी काँग्रेस पक्षातून केली होती. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्षात ते एक खंबीर नेते म्हणून ओळखले जात होते. जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोट बांधण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र अचानक त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
