संगमनेर(DSNews24/किरण पुरी) माझं झाडांवर खुप प्रेम आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. जिल्ह्यात गतवर्षी ४ लाख वृक्षलागवडीच्या टार्गेट पेक्षा ८ लाख वृक्षांची लागवड केली. यंदा १४ ट्रीज फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ६० ते ६५ ठिकाणी वृक्ष लागवडीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. साकूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ४२ एकरावर हा प्रकल्प उत्कृष्ट नियोजनबद्ध राबविला जात आहे. उजाड माळरानावर पुढील पाच वर्षांत जंगलासारखी परिस्थिती निर्माण होईल. तसेच शंकरराव खेमनर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यासिका उभारली जाणार हा चांगला संकल्प आहे. तसेच सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून १४ ट्रीज कौतुकास्पद उपक्रम राबवित आहे. त्यांच्यामाध्यमातून जिल्ह्यात चांगली वृक्षलागवडीची चळवळ राबवून उत्तम हरित अहिल्यानगर जिल्हा घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.
१४ ट्रीज फाऊंडेशन, पुणे व कृषी विभाग, पंचायत समिती संगमनेर यांचे संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कृत हरित अहिल्यानगर अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने चितळकवर वस्ती शिवारात राबविण्यात येत असलेल्या “ग्रामपंचायत साकूर ऑर्बिट ९ प्रकल्पाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, १४ ट्रीज फाऊंडेशनचे व्यवस्थापक अनंत तायडे, संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रविण सिनारे, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, सरपंच सचिन सोनवणे, मुळा खोरे पतसंस्थेचे चेअरमन विठुराज मैड, ग्रामपंचायत सदस्य निसार पटेल, सहाय्यक मार्गदर्शक बजरंग बोरकर, ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे, कृषी अधिकारी अजितानंद पावसे, राजन जांभळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून नैचरल्स रोपवाटिका व कृषी अभ्यासिकाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रकल्पात राबविण्यात येत असलेल्या शेततळे, सौर ऊर्जा व इतर उपक्रमाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी साकूर ग्रामपंचायतीच खास कौतुक केले. ग्रामपंचायतीच उत्कृष्ट कार्य प्रगतीपथावर असल्याचे सांगत त्यांनी शंकरराव खेमनर यांच्या कामाच भरभरून कौतुक केले.
