संगमनेर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच थाटामाटात संपन्न झाला. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या लेकीच्या लग्नातील खर्चावरून आणि लग्न साधी करा, या त्यांच्या उपदेशावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लेकीच्या लग्नात त्यांनी केलेला खर्च पाहून अनेक जण त्यांच्यावर टीका करीत आहे. महाराजांच्या कथनी आणि करणीत फरक असल्याचे अनेक जण म्हणत आहेत. याच टीकेला मुलीचे लग्न लागल्यानंतर लगोलग इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
इंदुरीकर महाराजांचे ट्रोलर्सला जोरदार उत्तर
आपल्या कीर्तनातून ‘साधे लग्न करा’ असा उपदेश देणारे इंदुरीकर महाराज यांनी मुलीचे थाटामाटात लग्न केले याचे कारण देताना म्हणाले, मी जरी कीर्तनातून लग्न साधे करा असे सांगत असलो तरी ते गरिबांसाठी आहे. रीन काढून सण करू नका, असा उपदेश त्यामागे असतो. मात्र ज्याची परिस्थिती चांगली आहे, त्याने चांगला विवाह सोहळा करावा, यासाठी कुणाची काही हरकत असण्याचे कारण नाही.
जशी माझ्या मुलीच्या साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, तशी या विवाहाची चर्चा देखील वर्षभर होईल याची मला खात्री आहे. मी साधे लग्न करा असे कीर्तनात सांगतो, हे खरं आहे. पण ज्याची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी मोठा विवाह सोहळा नक्कीच करावा. त्यावर टीका करण्याचे कारण नाही, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.
लग्नातील मेन्यू आणि लाखांच्या जेवणावळीवरही उत्तर
लग्नातील जेवणावरून होणाऱ्या टीकेवर बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले, मी लग्नात मठ्ठा किंवा गुलाबजामसारखे पदार्थ ठेवले नव्हते. आम्ही पूर्णपणे मराठमोळं आणि सात्विक जेवण पाहुण्यांना दिले आहे.
एवढा पैसा आला कुठून? इंदुरीकरांनी खर्चाचा हिशोबच मांडला
लग्नातील भव्यता पाहून एवढा पैसा कुठून आला? असा प्रश्न मला अनेक जण विचारतील. माझ्या मुलीच्या लग्नाचा ९० टक्के खर्च माझ्या भक्तमंडळाने केला आहे. देणाऱ्यांनी श्रद्धेने दिलं आहे, त्यामुळे त्यावर ट्रोल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे कडक शब्दात ट्रोलर्सला इंदुरीकरांनी सुनावले. त्याचबरोबर मी समाजोपयोगी कामं करतो, विद्यालय चालवतो जिथे १३ शिक्षक आहेत आणि मी विद्यार्थ्यांकडून एक रुपयाही घेत नाही, असे आवर्जून त्यांनी सांगितले.
मुलाची भेट होऊन तीन वर्षे झाले हे कुणाला दिसत नाही
सतत कीर्तनासाठी महाराष्ट्रभर फिरत असल्याने महाराजांना कुटुंबासाठी वेळ देता येत नाही, ही खंतही त्यांनी बोलून दाखवली. आज मुलगा आणि मुलगी मोठी झालेली दिसतायेत, पण मी कीर्तनासाठी बाहेर असल्याने त्यांची भेट होत नव्हती. माझ्या मुलाची तर माझी गेल्या तीन वर्षांपासून भेट झालेली नाही, असे भावूक होऊन त्यांनी सांगितले.
नास्तिकांवर निशाणा
नास्तिक लोक त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत. पण ज्यांनी प्रेम दिलं, त्यांनी ते शेवटपर्यंत टिकवावं, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
