राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट दिली. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीची तारीख सांगितली. ३० जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करू असे त्यांनी सांगितले. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट दिली.
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, ‘राज्य सरकारची कर्जमाफीच्या संदर्भात तयारी अंतिम टप्प्यात आहे. या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा पार पडली आहे. काही जिल्ह्यांची अतिरिक्त माहिती मागवण्यात आली असून ती आल्यानंतर प्रक्रिया सुरू केली जाईल. ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्यात येईल.’ दरम्यान, बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी सरकारने जून महिन्यात कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीसंदर्भात तारीख सांगून टाकली.
पुणे ॲग्री हॅकेथॉन पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, ‘ही संकल्पना योजना राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. आज सर्वांना माहिती आहे पारंपारिक शेती न करता एआय मार्फ अधिक आणि चांगलं उत्पन्न देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि एकूण मंडळांची इच्छा आहे. कृषी विभागातील एआय धोरण वापरणारे देशातील पहिले आपल्या राज्य ठरलं आहे. शेतीमध्ये नवीन गोष्टी आत्मसात केल्या तर यश मिळाले. कृषीचा कार्यक्रम म्हटले की निश्चित अजितदादांची आठवण येते.’
‘अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत. शेतीत बांधावर जाणार नेता, धारा काढणारा नेता आपल्यात राहिला नाही. पण त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. शेतमालासा चांगला बाजारभाव कसा मिळेल हे आम्ही पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना कायमच मदत केली आहे. शेतकरी सुखी समाधानी राहिला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. लवकर कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री घेतील.’
