साकूरफाटा – शिंदोडी राज्यमार्ग घेणार मोकळा श्वास ; सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा दणका

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर फाटा – पिंपळगाव देपा – साकूर – मांडवे बुद्रुक – शिंदोडी राज्यमार्ग ३६ वर रस्त्याच्या सरकारी जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधलेल्या बांधकामांना संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस दिल्या आहेत. जवळपास २०० अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आल्या असून ही सर्व अतिक्रमणे संबंधितांकडून तात्काळ काढण्यात यावीत असे आदेश देण्यात आले आहे. तसेच लवकरच अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग हाती घेणार असल्याने अतिक्रमण धारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, साकूर फाटा ते शिंदोडी राज्यमार्ग ३६ वर रस्त्याच्या शासकीय जागेवर अनेकांनी नियमांचे उल्लंघन करत अतिक्रमण केले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंनी साधारणपणे १५ मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम असू नये असे धोरण आहे. मात्र या नियमाला झुगारून अनेकांनी छोट्या मोठ्या टपऱ्या, दूकान उभारली आहे. तसेच मोठं मोठी बांधकामे देखील केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण धारकांना आधी वारंवार नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर साकूर फाटा ते शिंदोडी राज्य मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संगमनेर उप विभाग यांच्या अखत्यारीत येत असून, त्यांच्यामार्फत ८ एप्रिल २०२६ रोजी साधारणपणे २०० जणांना नोटिसा दिल्या. तसेच नोटीस मिळाल्यापासून पुढील ७ दिवसात अतिक्रमण काढून शासकीय जागा पुर्ववत करण्यात यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम खात्याने जाहिर केले.

तसेच सद्यस्थितीत या रस्त्याकरिता संपादित करण्यात आलेल्या जागेत करण्यात आलेले बांधकाम तसेच तात्पुरती टपरी आणि शेड अशा स्वरुपाचे बांधकाम हटवण्यात यावे असे सूचित केले आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यमार्ग ३६ वर रस्त्याच्या दोन्ही बाजूला १५ मिटरपर्यंत हद्द निश्चितीच्या खुणा केल्या. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करणार हे निश्चित झाल्याने अतिक्रमण धारकांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. त्यामुळे काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे. तसेच जे अतिक्रमण काढणार नाहीत त्यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लवकरच बुलडोझर फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला राज्यमार्ग ३६ मोकळा श्वास घेणार आहे.

Leave a Comment