संगमनेर – मांडवे बुद्रुक येथील शेतकऱ्यांच आमरण उपोषण अवघ्या दोन तासातच सुटल

संगमनेर(DSNews24) तालुक्यातील मांडवे बुद्रुक शिवारातील डोमाळे वस्ती येथील गट नंबर ३१६ मधून कायम वहिवाटीचा रस्ता तातडीने खुला करण्यात यावा या मागणीसाठी पवनराजे मारूती डोमाळे, पांडुरंग कोंडीभाऊ डोमाळे, योगेश बाळासाहेब डोमाळे, विलास सोपान ढेंबरे, बाळशिराम कोंडीभाऊ डोमाळे, सुभाष गोविंदा डोमाळे अतिश भाऊसाहेब झिटे या शेतकऱ्यांनी दि. १२ जून रोजी संगमनेर तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आमरण उपोषण सुरू केले होते.

तसेच जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावर ठाम असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले होते. मात्र अवघ्या काही तासांतच तहसीलदार धीरज मांजरे यांनी या उपोषणाची दखल घेतली. तसेच उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करत कायदेशीररीत्या संबंधित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे तहसीलदार धीरज मांजरे यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उपोषणकर्त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच शेतातील माल शेतातून बाहेर आणण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गट नंबर ३१६ मधून कायम वहिवाटीचा रस्ता तातडीने खुला करण्यात यावे अशी मागणी पवनराजे डोमाळे, पांडुरंग डोमाळे, योगेश डोमाळे, विलास ढेंबरे, बाळशिराम डोमाळे, सुभाष डोमाळे अतिश झिटे या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती.

तसेच १० जून पर्यंत सदर कायम वहिवाटीचा रस्ता खुला केला नाही तर आम्ही १२ जून रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली.

आमरण उपोषणाला बसल्यानंतर अवघ्या काही तासांतच उपोषणकर्त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, महसूल नायब तहसीलदार अनुप गिरी यांनी उपोषणस्थळी धाव घेत परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यातूनच संबंधित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. शेवटी उपोषणकर्त्यांनी तहसीलदारांच्या विनंतीला मान ठेवून आपलं आमरण उपोषण मागे घेतले.

Leave a Comment