बिग ब्रेकिंग! रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

रायगडच्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात (Accident news) घडल्याची घटना समोर आली आहे. या घाटात एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गातील आंबेनळी घाटाच्या (Ambenali Ghat) परिसरात ही दुर्घटना घडली. स्कॉर्पिओ गाडी (Scorpio Car) खोल दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरु झाले. बचाव पथकांना आतापर्यंत दोन मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटात जवळपास 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळली आहे. ही स्कॉर्पिओ गाडी साताऱ्यातील असल्याचे समजते. यामध्ये सातारा, आसगाव आणि कोरेगाव येथील पर्यटक असल्याची माहिती आहे. अद्याप अपघाताचे कारण आणि मृतांची ओळख पटलेली नाही. बचाव पथकाकडून स्कॉर्पिओ गाडीतील इतर प्रवाशांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात अनेकदा अपघात घडतात. हे सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक प्रशासन, ट्रेकर्स आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, खोल दरी आणि कठीण भूप्रदेशामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित सहा जणांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. रात्रीच्या अंधारात मृतदेह शोधण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र, आता दिवस उजाडल्याने बचावकार्याला वेग येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment