यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका सक्रिय कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
गजानन सुरोशे असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव असून ते महागाव तालुक्यातील वडद-मुडाणा येथील रहिवासी होते. या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर गोवंशाची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गजानन सुरोशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिजोरा टोल नाक्याजवळ सापळा रचला होता. मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद वाहन दिसताच गजानन यांनी आपल्या कारने तस्करांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.
मात्र, तस्करांनी आपले वाहन उमरखेडपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकळी (ज.) गावाच्या दिशेने वळवले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या तस्करांच्या एका मोठ्या टोळीने गजानन यांच्या कारला चारही बाजूंनी वेढा घातला. आरोपींनी गजानन यांना जबरदस्तीने गाडीबाहेर ओढले आणि दगड तसेच लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या गजानन यांना ग्रामस्थ तातडीने रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. मृताचे भाऊ ज्ञानेश्वर सुरोशे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुख्य आरोपी शेख सुलतान अलावली (रा. सुकळी ज.) आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), १०३ (१), आणि ३ (५) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून एक बोलेरो पिकअप वाहन जप्त केले आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी हैदराबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
